05/05/2021
कोकणातल्या आठवणी ७
आताची आपली घर कशी ? तर चकचकीत फरशी, गुळगुळीत भिंती, खिडकीला बसविलेल्या काचा, जाळ्या आणि दर सहा महिन्यातून केल जाणार पेस्ट कंट्रोल यामुळे घरात किडा मुंगी सहसा दृष्टीस पडत नाही..
आमच्या कोकणातल्या घरात मातीच्या भिंती, शेणाची जमीन, दार खिडक्या कायम सताड उघड्या त्यामुळे घरात आणि अंगणात आमच्या सोबत कितीतरी प्रकारचे किटक गुण्यागोविंदाने रहायचे..
माजघरात लाल काळ्या मुंग्या बिनधास्त फिरत असायच्या, जरा काही कुठे सांड लवंड झाली की मोठाले डोंगळे नाकं वर करून हजर, त्यांच्यावर नजर ठेवून चांगले हाताच्या पंजा एवढे मोठाले कोळी जाळी विणून कोनाड्यात, घराच्या वळचणीला ध्यानस्थ बसलेले असायचे. न्हाणीघरात बादलीखाली घोणी, वनगाई हमखास असायच्या. आमच्या घरच्या कमी वावर असणार्या बाळंतिणीच्या खोलीच्या दारा जवळ नेहमी वाळवी लागलेली असायची, त्यांच्या लाल पट्टेरी मातीच्या घरात पांढरे वाळवीचे किडे दिसायचे. दरवाजाच्या किंवा खिडकीच्या कोपर्यात कुंभार माशीची घर लपलेली असायची.
संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस तर काय, कितीतरी छोटे किडे, घरात शिरायचे. तेव्हा संध्याकाळी कंदील, चिमण्या लावण्याच काम माझ असायच. दिवा, कंदील लावला की त्याच्याभोवती असंख्य किटक जमायचे, पतंग दिव्यावर झेपावायचे. यांना खायला चांगल्या धष्टपुष्ट आणि धीट पाली दबा धरून बसायच्या. त्यांची चूकचूक ऐकली की आम्ही 'कृष्ण कृष्ण' अस म्हणायचो. घरात एक दोन बेडक्या सुद्धा वस्तीला असायच्या त्यांना लक्ष्मी मानून कुणी हाकलत नसे, त्याही बिनधास्त इकडे तिकडे उड्या मारून मोठाले किडे गट्टम करायच्या. रात्र वाढली की रातकिड्यांची किरकिरही वाढायची. एखादा रातकिडा चुकून माकून घरात शिरला तर त्याच्या कर्कश्श आवाजाने अगदी नको व्हायच.
पावसाळ्यात तर इतके विविध किटक दिसायचे की विचारूच नका. टोळ, नाकतोडे, झिट्टया अशी मंडळी घरात शिरायची. कधी कधी छोट्या बेडकांची फौज अंगणात दाखल व्हायची आणि पन्नास एक बेडक्या घरातसुद्धा शिरायच्या, तेव्हा त्यांना पिटाळताना एकच तारांबळ उडायची. कधी रात्री काजव्यानी उजळून निघालेल एखाद झाड इतकं मोहक दिसायच.
उन्हाळ्यात आंब्या फणसाच्या वासाने केमऱ्या यायच्या या डोळ्यापुढे नाचणार्या केमर् या काही म्हणून सुचू द्यायच्या नाहीत. तेव्हा पाहुणे येणार म्हणून पेट्यातून चादरी काढल्या की त्यात चमचमणारया कसरी इकडे तिकडे पळायच्या.
घरात मांजरी असायच्या त्या जवळ आल्या की त्यांच्या अंगावरच्या पिसवा कधीकधी आपल्यालाही चावायच्या. तेव्हा मुलींच्या डोक्यात उवा लिखा असायच्या. त्या काढण्याचा खास कार्यक्रम असायचा.
गोठ्यात, गुरांच्या अंगावरच्या गेचिड्या त्यांना हैराण करायच्या. शेणात शेण किडे लपलेले असायचे.
इथे एक गोष्ट म्हणजे डास आणि झुरळं हे आत्ता घरोघरी दिसणारे पाहुणे मात्र मी कधीच पाहिले नाहीत.
आमच्या मागल्या अंगणात तुळशीपाशी मोठ्या वारुळात मुंग्यांची सतत येजा सुरू असायची. अंगणाच्या कडेने घुंगरू मासा नवाच्या किड्यांची गोल गोल घर असायची. त्यांना तळहातावर ठेवून त्यांच्या भोवती बोट वर्तुळाकार फिरवून आम्ही त्याला काशीची वाट दाखव म्हणलं की तो उत्तरेकडे तोंड करून थांबायचा, कस काय कोण जाणे. फूलबागेत सुंदर नाजूक फुलपाखरं असायची त्यांचा पाठलाग करावा तर एखादा सुरवंट चांगला प्रसाद द्यायचा. विहिरीजवळ गोगलगायी दिसायच्या. बागेत झाडांवर ओंबिल त्यांच्या घरात येजा करताना दिसायचे. भुंगे, मधमाशा, गांधील माशा, चतुर नेहमीच भेटायचे.
हे सगळे आमच्या अवतीभोवती.. किती जैववैविध्य.. त्यांच्याबरोबरच आम्ही वाढलो. आम्हाला या कुणाचीच कधी भिती वाटली नाही. आम्ही त्यांना आणि त्यांनी आम्हाला कधीच विनाकारण त्रास दिल्याच स्मरणात नाही. त्याना जपत, त्यांच्याकडून खूप काही शिकत आम्ही मोठे झालो. हे सगळे लहान मोठे किटक आमचे सोबतीच होते..
जोशी आजी
शब्दांकन गौरी नातु